कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापूरमध्ये एका चांदी व्यापाऱ्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पंचतारांकित एमआयडीसीमधील सिल्व्हर झोनमध्ये रविवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे हुपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे (वय-31) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरीच्या उद्देशानेच ब्रह्मनाथ हालोंढे यांची हत्या केली असावी. कारण ब्रह्मनाथ हालोंढे यांच्या हत्येनंतर त्यांच्याकडील 25 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने तपास सुरु केला आहे. सध्या हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार आणि ब्रह्मनाथ हालोंढे यांचा मारेकरी सापडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, ब्रह्मनाथ हालोंडे यांचे हिरा ज्वेलर्स या नावाने चांदीचे दागिने विक्रीची स्वतंत्र फर्म आहे. ते देशभरातील ठिकठिकाणी पेठांमध्ये जाऊन ते व्यवसाय करीत असतात. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे आई- वडिलांशी फोनवरुन बोलणे झाले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आई-वडील घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. आत प्रवेश करताच त्यांनान ब्रम्हनाथ हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.
पोलिसांनी ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चांदी उद्योजकांमध्ये घबराट पसरली आहे.