मुरगूड : शाळेकडे निर्जनवस्तीतून जाणाऱ्या दोन शाळकरी मुलींना अज्ञातांनी मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींनी आरडाओरडा करताच त्यांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थी व पालकांत भिती पसरली आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, मुरगूडपासून एक किलोमीटर अंतरावरील शाहूनगर मधून हर्षदा रतन जगताप (वय ११) व सिध्दीका सुधाकर वडर (वय १२) या दोघी मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निर्जन वस्तीतून रस्त्याने शाळेकडे येत होत्या. दरम्यान काळा ड्रेस व बुरखा परिधान केलेला एक इसम अचानक ऊसातून बाहेर येत त्या मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करत जवळ आला. त्याचवेळी त्याने आपल्या अन्य साथीदाराशी कन्नड भाषेतून मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर तो क्षणार्धात तेथे मारुती व्हॅन घेऊन आला.
या व्हॅनमध्ये हर्षदाला जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न करत असताना सिध्दीकाने आरडाओरडा करीत पळ काढला. तर हर्षदाने प्रसंगावधान राखत आरडाओरड करीत त्या इसमाला दगड मारत आपली सुटका करून घेतली. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनी तेथून मारुती व्हॅनमधून पळ काढला. घाबरलेल्या हर्षदा व सिध्दीका या दोघी शाळेत न जाता सरळ घराकडे गेल्या व त्यांनी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. या प्रकाराने शाहूनगर परिसरात खळबळ उडाली.
पालकांनी या प्रकरणी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत. मुरगूड पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजीराव करे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली आहे.