कराड : स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर (ता. कराड) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पहिलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता राज्य शासनाने २५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कराडलगतच्या गोळेश्वरमध्ये खाशाबा जाधव यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कुस्ती क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे आणि थेऊर ग्रामपंचायतचे सदस्य तथा आरोग्यदूत व कुस्तीपटू युवराज काकडे यांनी विशेष प्रयत्न केले.
कुस्तीपटू खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देऊन २५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या क्रीडा संकुल उभारणीची तब्बल एक तपाची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी परिपूर्ण असे हे संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या भव्य क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅडमिन एरिया, किचन व डायनिंग स्वच्छतागृह, जिम, व्हीआयपी रूम, टीएम ए व बी रूम, ऑडिओ व्हिज्युअल रूम, फील्ड ऑफ प्ले, मॅट, मुला-मुलींची डॉमेन्ट्री, टॉयलेट, ५०० लोकांची आसन व्यवस्था असलेली प्रेक्षक गॅलरी या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.