पंढरपूर : राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असून त्यामुळे आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. दरवर्षी प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात. मात्र, सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं प्रशासनानं पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झाली.
कोण आहेत मानाचे वारकरी?
विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरले ते म्हणजे सगर कुटुंबीय. सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात. आज कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पार पडली. यानंतर पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली आहे.
पांडुरंगाच्या कृपेनंच महापूजा करण्याचं भाग्य : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पांडुरंगाच्या कृपेनंच आपल्याला ही महापूजा करण्याचं भाग्य लाभलंय, योगायोगानं आचारसंहिता सुरू असल्यानं शासनाचा आदेश मिळाला आणि हा महापूजा करण्याचा मान मिळाल्याचं डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आयुष्य सुखकर होवो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो, असं साकडं विठुरायाला घातल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणूक शांततेनं पार पडावी ही मनातील सुप्त इच्छा पांडुरंग चरणी मांडली. मात्र, मला खात्री आहे, महाराष्ट्रातील निवडणूक नेहमीच शांततेनं पार पडते, असंही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हटले. मी बालपणापासून देवाच्या दर्शनाला येत आलोय, प्रत्येकवेळी एक वेगळं समाधान आणि आनंद विठ्ठल दर्शनानं मिळत होता. मात्र, यावेळी तो खूपच खास होता, अशा भावनाही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं. आपल्या लाडक्या माऊलीचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.