सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील श्री क्षेत्र मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त सातारा पाेलिस जिल्हा दलाने 24 जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत वाई शहरातील वाहतुकीत काही अंशी बदल केले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतेच जारी केले आहेत. दरम्यान, मांढरदेव गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे मांढरदेवीचे मंदिर १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते. या काळात भाविकांची गडावर गर्दी असते. मांढरदेव येथील काळूबाईची वार्षिक यात्रा 24 ते 26 जानेवारी या काळात आहे. भाविकांना साेयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाची नुकतीच वाई शहरात बैठक झाली.
यंदा 25 जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस आहे. या निमित्त राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील भाविक गडावर येत असतात. यात्रा काळात वाई शहरात वाहतुक काेंडींची समस्या निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलिस दलाने 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात वाहतुकीत बदल केले आहेत.
जाणारा मार्ग – किसनवीर चाैक – पी. आर. सायकल मार्ट – ग्रामीण रुग्णालय – दातार हाॅस्पीटल – चावडी चाैक – सूर्यवंशी चाैक ते एमआयडीसी – मांढरदेव गड.
येणारा मार्ग – एमआयडीसी मार्गे सूर्यवंशी चाैक – जामा मशिद – फुलेनगरकडे जाणार मार्ग.