सांगली : सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. जामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मरगुबाई मंदिरासमोरच चौघा हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी भर वस्तीत निर्घृण खून केला. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाचजणांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे.
अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 22, रा. जामवाडी,सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत हा एक कबड्डीपटू होता. तसेच तो एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून देखील काम करत होता. तो त्याच्या घराजवळील जामवाडी येथील सार्वजनिक मंडळातही सक्रिय होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्यानं एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग मुलांनी मनात ठेवला होता.जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुलं तिथे आली. त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद एवढा वाढला की, अगदी विकोपाला गेला. त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले. यातील एक घाव त्याच्या डोक्यात तर काही घाव हे पाठीत बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
भरवस्तीत खुनाची घटना घडल्याने याठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे संजय मोरे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी अनिकेतचा मोबाईल, बॅग पडली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिकेतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अनिकेतच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला होता.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अनिकेत हा चांगला कबड्डीपटू होता. त्यांच्या या हत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.