पंढरपूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील देवीचे दागिने गहाळ झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. यानंतर आता पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातूनही देवाचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नसल्याचे उजेडात आले आहे. लेखा परीक्षण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात देवाचे दागिने गायब होण्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अॅड. सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर धक्कादायक आरोप केले आहेत. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. श्री विठ्ठलाचे २०३ आणि रुक्मिणी मातेच्या १११ दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे.
चांदीचा पान पुडा, पिकदाणी, चांदीची दांडी असलेला हात पंखा, कुंकवासाठीची लहान वाटी, सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीनं मढवले आहेत. अशा ३१४ वस्तू आहेत. याची नोंद नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे. तर दागिने गायब झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. दागिन्यांचे मुल्यांकन न झाल्याने त्याची नोंद नसल्याचे स्पष्टीकरण मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
दरम्यान, लेखापरीक्षकांना रजिस्टर दाखवले नाही तर लेखा परीक्षण का केले? असा सवाल करण्यात आला आहे. आम्हाला ३१४ दागिने दिले नाहीत, असा लेखापरीक्षकांचा अभिप्राय आहे. दागिने सील करून ठेवले जात नाहीत. दागिने सील न केल्याने दागिने गायब करण्याला किंवा बदलण्याला वाव मिळतो. देणगी मोजताना बाहेर सुरक्षारक्षक नेमला नाही, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी काय?
शौचालय बांधण्यासाठी रेल्वेची जागा भाड्याने घेतली आणि २२ लाख ६ हजार ५७५ रुपये दिले. पण शौचालय बांधले नाही. सरकारने २०२६ पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. समिती बरखास्त करा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करा.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक घनवट यांचा आरोप काय?
देणगीसाठी आयकर विभागाचा ‘८० जी’चा नोंदणी नंबर कायमस्वरूपी न घेता देणगी घेतली जाते. तसेच भक्त निवासमधील हॉटेलला काम सुरु करण्याचा परवानाच दिला नसताना हॉटेल सुरु आहे. हॉटेलमध्ये भाविकांची आर्थिक लूट होत आहे.