सांगली : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आता आम्ही जास्त लक्ष देऊ, असा इशारा नूतन खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम या काँग्रेस नेत्यांनी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला. यानंतर आता जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून जयंतराव गोड बोलतात, पण टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात. आम्हाला त्या टोकाला जायला लावू नका, अन्यथा आहे ते सगळं गमवाल’ या जयंत पाटील यांच्या शब्दातच काँग्रेस नेत्यांना इशारा देण्यात आला. सांगली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टार्गेट करण्यात आले. सांगलीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळू नये, यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्यानंतर काँग्रेसचा जयंतरावांविरोधातील आक्रमकपणा आणखी वाढला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची एकी न बघवणाऱ्या बाहेरील काही लोकांनी आमच्यात खडे टाकण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना जागा दाखवून दिली. आता ते विधानसभेला आमचा नाद करणार नाहीत, अशा शब्दांत कदम यांनी अप्रत्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ही टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. यानंतर जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जुन्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल करत विशाल पाटील व विश्वजित कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार
लोकसभा निवडणुकीत व निकालानंतर काँग्रेसचे नेते विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर सातत्याने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष टीका केली जात आहे. काँग्रेसची सांगलीची जागा जाण्यामागे जयंत पाटील यांचाच हात असल्याचा संभ्रम या नेत्यांनी जिल्ह्यात व राज्यात निर्माण केला आहे. यामुळे जयंत पाटील काहीसे बैंक फूटवर गेले आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची किंमत काँग्रेस नेत्यांना मोजावी लागेल, असा इशारा आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी खासगीत देत आहेत.
सांगली, जत, मिरजेत काँग्रेसला अडचणीची शक्यता जयंत पाटील यांच्याकडून विधानसभेला कॉंग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात गेली दहा वर्षे पराभवाच्या मानसिकतेत असलेली काँग्रेस आता लोकसभेच्या विजयानंतर चांगलीत रिचार्ज व आक्रमक झाली आहे. विधानसभेला चार ते पाच जागा लढण्याची घोषणा काँग्रेस नेते करत आहेत. मात्र, जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका त्यांना या निवडणुकीत भोवण्याची शक्यता आहे. मिरज, जत व सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.