अकलूज : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान-मोठे व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला यांची महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट केली. विरोधकांना जेलमध्ये टाकून तसेच त्यांचे पक्ष फोडून त्यांना संपविण्याचे काम केले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे येथे माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ‘जातीधर्मात तेढ निर्माण करुन या देशाची सर्वधर्म समभाव अशी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु केला. अशा धर्मांध, ढोंगी व उद्योगपतींना श्रीमंत करणाऱ्या मोदी सरकारला नेस्तनाबूत करुन राज्यात महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच ते म्हणाले, ‘धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीने राज्यात परिवर्तनाची लाट आली आहे. देशात 400 पार म्हणणाऱ्या भाजपला आता 200 तरी जागा मिळतील का? अशी शंका निर्माण झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महागाई विरुध्द रान उठवणाऱ्या मोदी सरकारच्या काळात महागाई गगनाला भिडली आहे’.