कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात संताजी घोरपडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संताजी घोरपडे हे रविवारी प्रचारानिमित्त कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथे गेले होते. भेटीनंतर ते घरी जात असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना पाच ते सहा कार्यकर्ते रस्त्यावर थांबलेले दिसले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोरपडे यांच्या गाडीला हात दाखवत कार थांबवली. आपलेच कार्यकर्ते असावेत किंवा काहीतरी समस्या असेल या समाजाने घोरपडे ही गाडीतून खाली उतरले. मात्र पाच ते सहा जणांनी घोरपडे गाडीतून उतरताच त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्त वाहत होते. दरम्यान, हल्लेखोर दगडफेक करुन तेथून पसार झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संताजी घोरपडे आज पुन्हा प्रचारात उतरणार का, हे बघावे लागेल. संताजी घोरपडे यांच्यावरील हल्ल्यामुळे कोल्हापूरचे राजकारण शेवटच्या दिवशी तापण्याची शक्यता दिसून येत आहे.