सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पोटच्या अवघ्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला निष्ठूर आईने कु-हाडीने छाटून दोन तुकडे करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. एवढच नाही तर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडे नऊ ते सव्वा बारा या दरम्यान माढा तालुक्यातील कव्हे गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण महारष्ट्र हादरला आहे.
प्रणव गणेश चोपडे (वय ६, रा. कव्हे, ता. माढा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. खून झालेला मुलगा गावातील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रणवची हत्या निर्दयी आईने केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाची हत्या करून तणनाशक प्राशन केलेली त्याची आई कौशल्या ऊर्फ कोमल हिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे (वय ५७) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून त्यांची सून कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे अध्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी फिर्यादी नारायण आणि त्यांच्या पत्नी पार्वती दोघे दुचाकीवरन मौजे पाच पिंपळे (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास त्यांची सून कौशल्या ऊर्फ कोमल हिचा त्यांना फोन आला. रडत रडत तिने आपण मुलगा प्रणवचा खून केल्याची माहिती दिली. तेव्हा धक्का बसलेल्या नारायण चोपडे यांनी कौशल्याचा भाऊ नवनाथ जगताप (रा. कुर्डू, ता. माढा) आणि आपला मुलगा गणेश (मयत मुलाचे वडील) यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. दरम्यान, गणेश हा घरी आला असता पत्नी कौशल्याने कुऱ्हाडीने मारून चिमुकल्याचे दोन तुकडे केल्याचे त्याने पहिले.
कुर्डवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून नारायण चोपडे यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे, पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत.