लहू चव्हाण
पाचगणी : थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील टेबल लॅंन्ड पठारावर ‘आय लव्ह पांचगणी’ फेस्टिवल अंतर्गत आतंरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरविण्यात आला होता. या महोत्सवाचा विविध शाळेतील विद्यार्थी, पर्यटक व स्थानिकांनी आनंद घेतला.
या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात मोठ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या पतंग आकाशात उडविण्यात आल्या होत्या. यामध्ये कार्टून पतंग सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. तसेच, हवेत झेप घेत जेट्स, फायटर्स अशा छोट्या इंजिनवर उडणारी व बॅटरीवर उडणारी विमाने ही सर्व रिमोट द्वारे नियंत्रित करताना पर्यटकांना एक न्यारा आनंद मिळत होता.
‘या’ महोत्सवातलं खास आकर्षण
लांब शेपटी असणारे मत्स्य पतंग आणि ‘आय लव्ह पांचगणी’ पतंग हे या महोत्सवातलं खास आकर्षण ठरले. नेहमीच्या कागदी किंवा कपड्याच्या पतंगाबरोबरच वेगवेगळ्या आकारांचे पतंगही लक्ष वेधून घेत होते. हा महोत्सव पाहण्यासाठी अनेक भागातून पर्यटक आले होते.
पर्यटनाला चालना देण्यासाठी भरविण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे उद्घाटन मॅप्रो फूड प्रोडक्ट कंपनीचे डायरेक्टर मयूर व्होरा, सौ. राजवी व्होरा तर एरो माॅडेल फ्लाईंग शोचे उद्घाटन असरफभाई मर्चंट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र भगत, जाॅं. सेक्रेटरी मुराद खान, भारतभाई पुरोहित, राजेंद्र पारठे, निततीनभाई भिलारे, प्रशांत मोरे, जयवंत भिलारे आदित्य गोळे व फेस्टिवल टीमचे सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.