मुंबई : छत्रपती शिवरायांची वाघनखं भारतात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली. त्यावर बरीच चर्चा सुद्धा झाली.. वाघ नख घ्यायला सुधीर मुनगंटीवार लंडनलाही जाऊन आले. आता या मात्र या वाघनखांबाबत एक मोठा दावा केल्याचे समोर आले आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत. यावर आता शरद पवार यांनी भाष्य केले आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही, मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असे विधान शरद पवारांनी केल आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांचा दावा
वाघनखांवरून ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. लंडनमध्ये असलेली वाघनखं ही शिवरायांची नसल्याचा दावाच सावंत यांनी केलाय. भारतात आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत. लंडनच्या संग्रहालयाने पत्र पाठवून माहिती दिली. शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेलीच नाहीत. याविषयी उदयनराजे सांगू शकतील, असा खळबळजनक दावा इंद्रजीत सावत यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राची फसवणूक असून… : इंद्रजीत सावंत
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने असे सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री खोटे बोलत आहे. जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही, ती गोष्ट महाराजांची आहे असे सांगत, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे.तसेच वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.