महाड : पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असतात. यामुळे या दिवसात वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. असाच प्रकार महाड- भोर घाट रस्त्यावर झालेला दिसून येत आहे. दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठे दगड पडल्याने रस्त्याची खराबी झाली आहे. याची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याने भोर घाट रस्त्यातील धोका लक्षात घेता एसटीची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाड- भोर घाट रस्तावर भोर हद्दीतील वाघाजाई घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. पावसाळा संपायला दोन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर देखील या खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती अद्याप केलेली नाही. यामुळे या भागात घाट रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीसाठी जास्त धोकेदायक बनला आहे.
पावसाळ्यापूर्वी पासून सुमारे आठ महिने बंद असलेल्या या घाट रस्त्यावरून आता खाजगी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. मात्र एसटी बस सेवा अद्याप सुरु झालेली नाही. व्यवसाय, बाजार रहाट, नाते संबध या भागात जोडले गेल्याने पुणे जिल्ह्यातील भोर तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील नागरीकांना ये जा करताना आर्थिक भुर्दंडाचा फटका सहन करावा लागत आहे.
भोर घाट रस्त्याची खराबी झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यामुळे रायगड आणि पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ताच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर महाड भोर हा रस्ता सुरु करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.