करमाळा : नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यातील मटका, चक्री जुगार आदी अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले असून हे अवैध धंदे किती दिवस बंद राहणार का पुन्हा सुरू होणार? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख कुलकर्णी यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यात मटका पूर्णपणे बंद झाला असला तरी चोरीछुपे मोबाईल मटका सुरू आहे. मात्र याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. नव्याने सुरू झालेला चक्री जुगार बंद झाला आहे. पोलिसांनी या एका चक्रीवर धाड मारून गुन्हा दाखल केला. त्याचे क्लब पूर्णपणे बंद आहे. तीन पत्ती नावाचा जुगार करमाळ्यात प्रसिद्ध असून करमाळ्यात हा जुगार खेळण्यासाठी नगर, पुणे, धाराशिव, मुंबई या भागातील मोठे जुगारी येत असतात.
गांजा, भांग शहरासह ग्रामीण भागात सुद्धा सहज उपलब्ध होत आहे. इंजेक्शनद्वारे नशा घेण्याचे प्रमाण वाढले असून यातील चार आरोपी नुकतेच करमाळ्यात पकडण्यात आले आहेत. क्रिकेटच्या सट्टा बाजारात लाखो रुपये गमावलेले तरुण गाव सोडून गेले आहेत. सध्या बनावट दारूचा करमाळ्यात महापूर आला असून याबाबत उत्पादन शुल्क खात्याला निवेदन दिले आहे पण उत्पादन शुल्क खात्याने कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही.