कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार सभा पार पडत आहेत. राजकीय नेते दावे प्रतिदाव्यांसोबत टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अशातच लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथील सभेत वादग्रस्त विधान केले आहे. ‘जर काँग्रेसची रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये आपल्याकडून पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला जर दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या, आम्ही त्यांचा व्यवस्था करतो.’ असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी भरसभेत केले आहे. यानंतर महाविकास आघाडीने महाडिक यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे. महाडीक यांनी त्यानंतर यावर माफी मागितल्याचं समोर आले आहे.
लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला संदर्भात धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांचा व्यवस्था करतो. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही, पैशांचं राजकारण करणार का? असे धनंजय महाडिक सभेत भाषण करताना बोलले होते.
महिला आपली छाती बडवत आहेत की..
महाराष्ट्रात अनेक महिला आपली छाती बडवत आहेत की, आम्हाला सुरक्षा पाहिजे मग पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं, काँग्रेसच्या सभेला जर या महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. काँग्रेसच्या रॅली महिला दिसल्या तर फोटो काढायचे फोटो आमच्याकडे द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असेही सभेत महाडिक म्हणाले. धनंजय महाडिक यांनी भर सभेत लाडक्या बहिणींना दम भरल्याची चर्चा कोल्हापूरसह राज्यात सुरु झाली आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसकडून या वक्तव्याचा समाचार घेण्यात येत आहे. आपल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं समजताच महाडिक यांनी माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना देण्याची माझी भूमिका होती, असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत.