लहू चव्हाण
पाचगणी(पुणे) : कला व संस्कृतीने नटलेल्या “आय लव पाचगणी फेस्टिवल” राज्य पर्यटन महोत्सवात समाविष्ट झाला असून विभागीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्याचा मान यावर्षी पाचगणी फेस्टिवलला मिळाला आहे. पर्यटन नगरी पाचगणी शहराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एका छताखाली एकवटलेल्या ‘आय लव पाचगणी’ फेस्टिवल टीमच्या कार्याची पर्यटन विभागाकडून दखल घेण्यात आल्याने पाचगणीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्यातील पर्यटन महोत्सवांचे नियोजन पर्यटन संचालनालयाने केले आहे. त्यामध्ये पाचगणीचा आय लव पाचगणी या फेस्टिवलचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाने कळविले आहे. फेस्टिवलला दररोज १० ते १५ हजार पर्यटक भेट देतील, अशी अपेक्षा संचालन्यायालयाने व्यक्त केली आहे.
आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल मध्ये पांचगणी स्टेडियमवर होणारा सर्व स्कूलचा नेत्रदीपक भव्य दिव्य दिमाखदार उध्दघाटन सोहळा, टेबल लॅन्ड वरील ३ दिवस चालणारा आंतरराष्ट्रीय रंगी बेरंगी पतंग महोत्सव, ऐरो मॉडेलिंगचा थरारक शो, ढोल लेझीमचा आसमंत व्यापून टाकणारा नाद, आर्ट गॅलरी, रंगोली प्रदर्शन, शस्त्रांची ओळख, पेंटिंग्स, सायकल स्पर्धा, झुंबड उडवणारा वॉकिंग प्लाझा, मुख्य बाजारपेठेतील नयनरम्य रोषणाई, झुंबा डान्सवर थिरकणारी पावले, ट्रेजरर हंट मधून होणाऱ्या गमती जमती, ठग ऑफ वॉरची घमासान लढाई,हजारो बक्षिसांच्या लयलूटीनी सांगता होणार असा हा पांचगणी फेस्टिव्हल कार्यक्रम असणार आहे.