पुणे : महाबळेश्वर परिसरात पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा रोगराई पसरविण्याचे कारण ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राच्या (CSD) माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन’ संशोधन प्रकल्प राबवण्यात आला होता.
या प्रकल्पाअंतर्गत महाबळेश्वर परिसरात संशोधन करण्यात आले होते. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पात निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांचा समावेश होता.
दरम्यान, महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या आजारांचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने संशोधन करून यावर अभ्यास केला. घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळली जाऊन पाण्याच्या माध्यमातून ती नागरिकांच्या पोटात जाते.
यामुळे आजार होत असल्याचे दिसून आले आहे. डॉ. मस्तकार यांनी सांगितले की, या अभ्यासानंतर सुचवलेल्या उपाययोजनांचे पुढे काय झाले, पाण्याची गुणवत्ता सुधारली का, या अनुषंगाने पुढेही अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाद्वारे घोड्यांच्या मालकांशी चर्चा करून उपाययोजना राबवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.