कुर्डुवाडी (सोलापूर) : मुख्याध्यापक बापाने मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सापटणे भोसे (ता. म्हाडा) येथे घडली आहे. सोमवार, ३१ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास मौजे सापटणे (भो) (ता. माढा) येथे राहत्या घरी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील याने मला काही नोकरी नाही, मला काही तरी उद्योगधंदा करून द्या, असे म्हणून वडील बाळासाहेब पीतांबर पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली होती.
त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ, मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक वडिलांनी ३१ मार्च रोजी दुपारी ३:३० ते १ एप्रिल रात्री २ वाजण्याच्या सुमारास लऊळ शिवारात ढोरे वस्तीजवळ रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या धडकेने बाळासाहेब पाटील यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येबाबत निखिल बाळासाहेब पाटील (वय ३०, रा. सापटणे भो., ता. माढा) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि शिंदे करत आहेत.