अहमदनगर : मी जेव्हा भाषण करतो तर विरोधी पक्षनेते माझा राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलत आहेत. शुक्रवारी एक जण काहीतरी बडबला की, छगन भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली जालना जिल्ह्यातील अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभेला गेलो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुठेही अवमान करायचा नाही, पण काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 जानेवारीला मोर्चाला सामोरे गेला त्याला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे जर शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
मग उपोषण कशाला करता?
यावेळी भुजबळांनी अध्यादेशावरून मनोज जरांगे पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली. तुम्ही 27 जानेवारीला गुलाल उधळला. मग आता उपोषण कशाला करत आहात? अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे. आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असं सांगतानाच एक सर्व्हेक्षण करायला अर्धा तास जातो. अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते, खाडाखोड सुरू आहे. जर आता आरक्षण मिळालं आहे, गुलाल उधळलाय. मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे? जामखेड येथे अनेक खोटे दाखले दिले जात आहेत. अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.