सांगली : संपत्तीच्या वादातून नातवांनी वृध्द आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील पारेमध्ये घडली. पोलिसांनी या प्रतकरणी एका अल्पवयीन नातवासह,नातू आशिष निकम, सून रेणुका निकम अशा तिघांना अटक केली आहे.
सखुबाई निकम (वय 80) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. चिंचणी येथे सतीश निकम यांचा सोने-चांदी गलाईचा व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणीसह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता.
हा राग मनात धरून संशयित तिघांनी 19 फेब्रुवारी रोजी संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी जाऊन त्यांना धमकाले होते. तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासांच्या आत प्रॉपर्टी फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी देऊन हे तिघेही निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली.
त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर हे तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी विटा पोलीसांनी मयत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली. या घटनेची विटा पोलीसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.