कोल्हापूर : डॉक्टर महिलेचा वारंवार पाठलाग करून भररस्त्यात अश्लिल हावभाव करणारा कुख्यात गुंड अमोल महादेव भास्कर (वय ४० रा. जवाहरनगर) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादी डॉक्टर महिला आपल्या कारमधून जात असताना बुधवारी (ता. ७) सकाळी साडे दहा वाजता वाय. पी. पोवारनगर, साईबाबा मंदिर चौक येथे संशयीत अमोल भास्कर याने आपली कार त्यांच्या कारला घासून नेत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती रुग्णालयातून घरी जात असताना अमोलने दुचाकीवरून येऊन कारच्या पुढे थांबून पाठीमागून येण्याचा इशारा दिला. त्यानंतर इलेक्ट्रीक बाईकवरून येऊन अमोलने पाठलाग केला. अशा प्रकारे दुपारी चार वाजेपर्यंत तीन वेळा पाठलाग करून विनयभंग केला.
अमोलने केलेल्या या कृत्यामुळे संतापलेल्या डॉक्टर महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात जात पाठलाग करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अमोलवर खून, खुनाचा प्रयत्न, धमकावणे, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो जामीनावर बाहेर आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे तपास करत आहेत.