सातारा : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. असे असतानाच पुणे-बंगळुरु महामार्गावर जवळपास साडेपाच कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी सापडली आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर रविवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरु होती. काही दिवसांपूर्वीच अशापद्धतीने पुण्यात सोनं असलेलं कंटेनर पोलिसांनी पकडलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका येथेही पोलीसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं आणि 57 लाख रुपयांची चांदी सापडली आहे. महाराष्ट्रामधील एका बड्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याच्या मालकीचं हे मौल्यवान धातू असल्याची माहिती मिळत आहे. तळबीड पोलीस ठाण्यात आरटीओ, आयकर विभागाबरोबरच कराड तहसीलदारांची टीम घटनास्थळी हजर झाली आहे.
तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोने, चांदी तसेच संबंधित कार ताब्यात घेतली आहे. राज्यातील एका बड्या सोने व्यापा-याचे हे सोने असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या या सोन्याची तस्करी होती की कोणा व्यापाऱ्याचे आहे याबाबत तळबीड पोलीस तपास करत आहेत.
दरम्याम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी कोट्यावधी रूपये सापडत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. गाड्यांची तपासणी केली जात आहे, त्या तपासणीमध्ये हे सोने आढळून आले आहे.