प्रकाश सुरवसे
मोडनिंब (जि. सोलापूर) : मला माझी प्रकृती साथ देत नाही, मी आमदारकीला उभा राहणार नाही. गेली तीस वर्षांनी आमदार आहे. आता रणजीत सिंह यांना एकदा संधी द्या. माढा तालुका असाच विकासाच्या प्रगतीपथावर नेऊ असे मत माढा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले. माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे ‘गाव भेट’ कार्यक्रमांतर्गत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नवरात्रीनिमित्त देवीची पूजा आमदार शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
गेली तीस वर्षे मी आमदार आहे. तालुक्यातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास ठेवलेला आहे. या विश्वासाला पात्र राहून माढा तालुक्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, भीमा-सीना जोड कालवा, विविध संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. चाळीस लाख टन ऊस उत्पादन होत असून विविध प्रकारे झालेल्या विकासातून नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. रणजीत सिंह शिंदे माझा मुलगा असून त्याला एकदा संधी द्या, निवडून द्या, काम पहा पुढील वेळेस तुम्ही काही निर्णय घ्यायचा तो घ्या. पण, तालुक्याच्या विकासासाठी येणाऱ्या विधानसभेत रणजीत सिंह यांना आमदार करा. असे आवाहन विद्यमान आमदार शिंदे यांनी केले.
बंडू ढवळे तसेच जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे यांनी माढा तालुक्यात आमदार शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडला. सुज्ञ जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. तीस वर्षात केलेले काम जनता विसरणार नाही असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंभुराजे मोरे, बंडू ढवळे, माजी सरपंच बाळासाहेब भांगिरे, दिनकर मोरे यांची समयोचित भाषणे झाली. सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी भीमराव मोरे, बाबासाहेब माळी, राजाभाऊ पाटील, नागनाथ माळी, अतुल माळी, राजाभाऊ पाटील, सिद्धेश्वर मोरे, मधुकर गलांडे, श्रीरंग गलांडे, दत्तात्रेय मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बबन भांगिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.