दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलीने आईसमोरच माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धकादायक घटना घडली आहे. ही घटना दहिवडी-फलटण रोडवरील माणगंगा येथे मंगळवारी (दि. १०) घडली आहे. त्रिवेणी दादासाहेब कांबळे असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव असून ती दहिवडी मध्येच वास्तव्यास होती.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात ही मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. मंगळवारी (दि. १०) ती शाळेत आली होती. पण ती वर्गात दप्तर ठेवून बाहेर गेली. ही बाब शिक्षकांनी तिच्या आईला फोन करून सांगितली.
आईने शाळेत येऊन खात्री केली असता मुलगी शाळेत आढळली नाही. परंतु दप्तर मात्र शाळेत मिळाले. दप्तर घेण्यासाठी ती निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती. सुमारे सव्वाचारच्या सुमारास मुलगी शाळेच्या जवळ दिसली. त्यावेळी आई आपल्याला आता ओरडेल, मारेल या भीतीने शाळेच्या समोरून माणगंगा नदीच्या दिशेने पळाली. मुलगी पुढं क आई मागे पळत दहिवडी-फलटण रोडवरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पोहोचल्या. यावेळी आई तिला थांब थांब म्हणत असताना मुलीने दप्तर शेतात फेकले आणि नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.