अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या उक्कडगाव देवीचे येथे संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावातील असलेले गणेश कहांडळ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. एक कृतिशील आणि आदर्श शिक्षक गणेश कहांडळ यांनी शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शाळेत केलेला आमूलाग्र बदल शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना निर्माण केलेली ओढ, सर्वांशी स्नेह आणि जिव्हाळा यामुळे त्या शाळेतून बदली होताना अनेक विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक आणि उकड्गावातील नागरिक तसेच महिला गहिवरून गेल्या. या गावामध्ये अनेक शिक्षक रुजू होयला नकार देत असताना गणेश कहांडळ यांनी अत्यंत आनंदाने हे काम स्वीकारून इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा निर्माण केला. हसत खेळत शिक्षण देताना जुन्या झालेल्या शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. विद्यार्थिप्रिय बनलेल्या या शिक्षकाने गावातही सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध ठेवेले.
मात्र त्यांची काही दिवसातच उकडगाव येथून टाकळी येथे बदली झाली. त्यानंतर त्यांचा निरोप समारंभाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. अनेक विद्यार्थी रडले. गावकरी आणि महिलांनाही गहिवरून आले. ‘जाऊ नका सर, जाऊ नका सर’ म्हणून सर्व विद्यार्थी रडत होते. ‘मी सातत्याने येत राहीन. तुमच्यासोबत राहीन. बदली होण हा अपरिहार्य भाग आहे’ अशी त्यांनी समजूत काढली. या वेळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांच्या बदलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.