करमाळा : करमाळा व इंदापुर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आगोती (ता.इंदापूर )ते गोयेगाव (ता. करमाळा) दरम्यान उजनी जलाशयात पूल उभारण्याची मागणी खासदार धैर्यशिल मोहीते पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांची भेट घेत प्रत्यक्ष निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांनी म्हटले आहे, की करमाळा व इंदापूर तालु्यातील नागरीकांना हाकेच्या अंतरावरील असलेल्या गावात जाण्यासाठी भिगवण-टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्याच्या मार्गे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे व वेळेची बचत करण्यासाठी उजनी जलाशयातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी, डाळींब, ऊस व इतर फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा परिसर फृट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो.
उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात. कृषि पर्यटन, मासेमारी, साखर उद्योग, वनस्पती अभ्यास, नौकाविहार, जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी तसेच इंधन बचतीसाठी गोयेगाव (वाशिंबे )ते आगोती दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे. उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते आगोती नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सद्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे. आगोती ते गोयेगाव भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुकडुन तीनशे तीनशे मीटर पर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल.
इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव (वाशिंबे) असा पूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार आहे. करमाळा तालुक्यातील पोफळज ते टाकळी दरम्यानचे सर्वांना दळणवळणासाठी सोईस्कर होणारें मध्यवर्ती असे गोयेगाव (वाशिंबे)हे ठिकाण आहे उजनी पाणलोट क्षेत्रात या पूलामुळे सकारात्मक परिणाम होणार आहे. या पूलासाठी गोयेगाव, केतूर, पारेवाडी, सोगाव, उंदरगाव, मांजरगाव, राजुरी, कोर्टी, बळपूडी, कळाशी, आगोती, बिजवडी ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे मागणी केली आहे
सुयोग झोळ, वाशिंबे, ता करमाळा.