लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील महात्मा फुले विद्यामंदिर व कांताबेन जे.पी. महेता कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पियूष विनोद लकेरी याने राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुणे विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूषने हेप्पी या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तर फॉइल या प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावले.
पियूष हा इयत्ता चौथीपासून तलवारबाजीचा सराव करत आहे. स्पर्धेदरम्यान, वाईच्या त. ल. जोशी विद्यालयात त्याने नियमित सराव केला. तलवारबाजी करताना प्रथम जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय पदके त्याने मिळवली आहेत. २०२० साली ‘खेलो इंडिया’ या गेम्समध्ये त्याचा समावेश होता. राज्यस्तरीय तलवारबाजी खेळामध्ये टॉप ६४ मध्ये ३२ रँक त्याला प्राप्त झाली. तलवारबाजीमध्ये १९ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ईप्पी या प्रकारामध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले तर फॉईल या प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवले.
या यशाने पियूषने महात्मा फुले विद्यालयाचे नाव उंचावले आहे. याबद्दल स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, सह-सचिव प्राचार्य शेजवळ, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, महात्मा फुले विद्यामंदिर व कांताबेन जे. पी. महेता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य देसाई, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासूर्डे, प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप, राजपूत, प्रा. कदम, पवार, आर. जी. वर्णे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.