वाकडी (नगर) : अहमदनगर जिल्ह्यात शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीत असणाऱ्या विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले होते.
सहापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासे) येथे मंगळवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
बबलू काळे (वय २८), अनिल काळे (वय ५५), माणिक काळे (वय ६५), संदीप काळे (वय ३२), बाबासाहेब गायकवाड (वय ४०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर विजय काळे (वय ३५) हे नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
नेवासे तालुक्यातील वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत एक जुनी विहीर आहे. या विहिरीची कमी खोली असल्याने त्यामध्ये जनावरांचे शेण आणि मलमूत्र साठवले होते. मंगळवारी या विहिरीमध्ये मांजर पडले. त्याला वाचविण्यासाठी विशाल ऊर्फ बबलू काळे (वय २३) सर्वप्रथम विहिरीत उतरला.
खूप वेळ झाल्यानंतरही तो बाहेर आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे विहिरीत उतरले. अनिल काळे हेही वर आले नाहीत, हे पाहून शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड हे काळे यांच्या मदतीसाठी विहिरीत उतरले. परंतु, गायकवाडही वर आले नाहीत.
अनिल काळे यांचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांना आवाज आल्याने ते मदतीला विहिरीत उतरले. मात्र, ते देखील वर आले नाहीत. हे पाहून संदीप काळेंचे वडील माणिक काळे विहिरीत उतरले. परंतु, तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले. त्यानंतर विजय काळे हा कमरेला दोर लावून विहिरीत उतरला. त्याला विषारी वायूचे लक्षणे जाणवताच त्याने जोरात आवाज दिला. लोकांनी त्याला लागलीच वर काढले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रशासनास या घटनेची माहिती देत मदतीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर तहसीलदार संजय बिरासदार आणि पोलिस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ग्रामस्थांनी विहिरीत पंप टाकत पाणी उपसण्यास सुरुवात केली. अहमदनगर, श्रीरामपूर आणि संभाजीनगरहुन विशेष पथक देखील बोलाविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.