-लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील मार्केट मधील भाजीपाल्याची दुकाने व गोदामांना भीषण आग लागली. या घटनेत बाजारातील सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीच्या घटनेत कांदे, बटाटे, प्लास्टिकचे क्रेड आदींसह साहित्य जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिक युवकांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ डॉ. बी.डी.साव़ंत मार्केट मधील भाजीपाल्याच्या दुकानांना शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. दुकानात प्लास्टिक क्रेड व पोती असल्याने काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. या आगीत एकापाठोपाठ एक अशी एका ओळीतील 7 दुकाने जळून खाक झाल्याने भाजीपाला व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच पालिका कर्मचारी व अग्निशमन बंब, पाण्याचा टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन बंबाला अजय बोरा व महेंद्र बिरामणे यांच्या टॅंकरला असणाऱ्या डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी पुरवठा करण्यात आला. पालिका कर्मचारी व स्थानिक युवकांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.