सातारा : झेडपीत ओळख असल्याचे सांगून अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावतो म्हणून पाच लाखांहून अधिक रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका वकिलासह दोघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सुनील नारायण मोरे (रा. करंजे नाका, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अॅड. तय्यब आलमगीर मुल्ला (रा. संगमनगर सातारा) आणि आशिष रमेश माने (रा. कटापूर, ता. कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एक वर्षांपूर्वी हा प्रकार सातारा तहसीलदार कार्यालयासमोरील अॅड. मुल्ला यांच्या नोटरीच्या ऑफिसमध्ये घडला. सातारा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी ओळखीचे आहेत. जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर क्लार्क आणि शिपायाची नोकरी लावून देतो, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराचा मुलगा आणि इतर विद्यार्थ्यांकडून ५ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन घेतले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पैसे परत मागितल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली.