बार्शी : शहरात चुलत मामाने आपल्या अल्पवयीन भाचीला घरी नेऊन घृणास्पद कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा आणि नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने तिच्या आजीसोबत येऊन शहर पोलिसांत त्या चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लहानपणीच आईचे निधन झाल्याने पीडित अल्पवयीन तिच्या आजीसह सख्खा मामा व मामीसोबत राहण्यास आहे. सख्ख्या मामाच्या घरी चुलत मामाचे येणे-जाणे असते. तसेच अधूनमधून पीडितेस चुलत मामा त्याच्या घरी मुलांसोबत खेळण्यासाठी घेऊन जात असे व नंतर तिला घरी आणून सोडत असे. ६ फेब्रुवारी रोजी चुलत मामा व चुलत मामीसोबत घरी येऊन आजीशी गप्पागोष्टी झाल्यानंतर चुलत मामा व चुलत मामी त्यांच्या घरी जाताना पीडितेस ‘तू पण घरी चल, तुला आणून सोडतो,’ असे म्हणून त्यांच्या घरी नेले. त्या दरम्यान चुलत मामाची मुले शाळेत गेली. तर मामी स्वयंपाक करत असताना पीडितेस कणीक मळून देण्यास सांगितले.
पीडिता टीव्ही बघत रूममध्ये कणीक मळत असताना, अचानक चुलत मामाने तिच्यासमोर अश्लील कृत्य केले. तिच्याशी झोंबाझोंबी करत असताना घाबरून पीडित मुलगी जोरात ओरडल्याने आवाज ऐकून चुलत मामी बाहेर आली व तिने चुलत मामाला ढकलून दिले. आपलीच पोरगी आहे, असे कशाला करता, असे करण्यापेक्षा जहर खाऊन मर, अशी ती चुलत मामाला ओरडली. त्यानंतर चुलत मामीने संध्याकाळी पाचच्या सुमारास पीडितेस तिच्या मुलासोबत आजीच्या घरी पाठवून दिले.
पीडित मुलगी आजीच्या घरी आल्यानंतर रात्री आजीला व सख्ख्या मामीला घडला प्रकार सांगितला. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत सदर चुलत मामाविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.