बार्शी : ‘तुझ्या नावावरील दुकान व घर आमच्या नावावर कर, अन्यथा तुझ्या पोरीला नाचवून १५ लाख रुपये आण. तरच नांदवीण नाही तर तुझा काटा काढीण,’ अशी धमकी देऊन या कौटुंबिक वादातून सून व तिच्या मुला-मुलींना हाकलून दिल्याप्रकरणी प्रतिभा नितीन काळे यांनी बार्शी शहर पोलिसांत पती, दीर, सासू आणि नणंदेविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नितीन काळे, दीर दीपक काळे, सासू छबुबाई काळे, नणंद रागिणी काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा पती नितीनवर कर्ज झाले होते. माहेरहून पैसे आण, नाहीतर तू नाचायला जा, असे म्हणून सतत त्रास देत असल्याने याबाबत प्रतिभाने माहेरी आईस सांगितले होते. त्यावेळी आईने स्वतः पैशाची जुळवाजुळव करून जावई नितीन यांना ४ लाख रुपये दिले होते. त्यानंतर पुन्हा पैशाची अडचण असल्याने माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून प्रतिभा व मुलींसोबत वाद घालत त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.
तसेच कुटुंबातील सर्वांनी तुझ्या नावावर असलेले दुकान व घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुझ्या मुलीला आमच्यासोबत चिरा उतरायला पाठव, आम्ही पैसे कसे वसूल करायचे ते पाहतो, असे म्हणून मुलीला व फिर्यादीस मारहाण केली होती.तू तलाक दे, नाहीतर तुला केजमध्ये राहू देणार नाही. तुझा काटा काढीन, अशी धमकी दिली होती. वाद वाढत गेल्याने फिर्यादी व मुलांना घरातून हाकलून दिले. तेव्हापासून फिर्यादी माहेरी बार्शी आईकडे राहत आहे. ८ जून रोजी पती नितीन बार्शीत आल्यानंतर फिर्यादीने पतीस तुम्ही मला व लेकरांना नीट संभाळा तुमचेसोबत नांदण्यास तयार आहे, असे सांगितले. त्याने आमचे ठरले आहे, तुझ्या नावावरील घर व दुकान आमच्या नावावर कर, नाहीतर तुझ्या पोरीला नाचवून १५ लाख रुपये आण. तरच मी तुला नांदविण, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.