बार्शी: घराशेजारी गांजा ओढत बसलेल्या दोघांना येथे गांजा ओढू नका, असे म्हटल्याने संतप्त झालेल्या दोन तरुणांनी दिव्यांग व्यक्ती आणि त्याच्या अल्पवयीन मुलावर धारदार कुकरी व लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बार्शी शहरातील संतोषी माता चौक, सुभाषनगर येथे घडली.
दत्तात्रय संभाजी सावंत (वय ४५) हे दिव्यांग असून, त्यांचा लाकडाचा व्यवसाय आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचा मुलगा समर्थ सावंत (वंय १६) हे आपल्या घरासमोर बसले होते. त्यावेळी राजू रमेश पारडे व विशाल रमेश पारडे (दोघे रा. नागवाली गल्ली, झाडबुके मैदान, बार्शी) हे सावंत यांच्या घराशेजारीच गांजाची नशा करत बसले होते. सावंत यांनी त्यांना येथे गांजा ओढू नका, असे सांगितले. त्यानंतर विशाल पारडे याने संतापून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने समर्थ सावंत याच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ जोरात मारले, त्यामुळे तो जखमी झाला. त्यावेळी सावंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता राजू पारडे याने कमरेला लावलेली धारदार कुकरी काढून त्यांच्या डोक्यावर वार केला.
विशाल पारडे याने सावंत यांना अपशब्द वापरले, आम्हाला येथून जायला सांगतो काय? असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डावा हात आणि मनगटावर जोरदार वार केले. तसेच, राजू पारडे याने कुकरीने डोक्यावर वार करत असताना सावंत यांनी तो वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली.
या घटनेनंतर दोघांनीही ‘आमच्या वाटेला गेला, तर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर सावंत यांनी पोलिसांना माहिती दिली. जखमींवर जगदाळेमामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दत्तात्रय सावंत यांनी राजू रमेश पारडे आणि विशाल रमेश पारडे यांच्या विरोधात तक्रार दिली असून, पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.