सातारा : साताऱ्यातील कन्या शाळेतील मैदानावर कबड्डी खेळताना युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षदा विजय देशमुख (वय-१५, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेनं शाळा प्रशासन पुरते हादरुन गेले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, कन्या शाळेच्या मैदानावर दहावीच्या मुली कबड्डी खेळत होत्या. यामध्ये अक्षदाही होती. खेळताना पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जखमी झाली. त्यामुळे ती बाजूला बसली. मात्र काही क्षणात तिच्या नाकातून रक्त येऊ लागले व ती बेशुद्ध पडली. पालकांनी अक्षदाला उपचारासाठी सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या संपूर्ण घटनेमध्ये शाळा प्रशासनाचे कोणीही सोबत नसल्याने उपचारामध्ये विलंब झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सदर मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.