सोलापूर : थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने त्याच्या मुलाचा खून केल्याची घटना सोलापूरात घडली आहे. यामुळे १४ वर्षांच्या चिमुकल्याला हाकणाक आपला जीव गमवावा लागला आहे. शाळेत आणि घरात अभ्यास न करता सतत खोड्या करणे, शाळेत उध्दट वागणुकीबद्दल नेहमी तक्रारी, सतत मोबाईल पाहणे यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या पोटच्या दोळ्याला विष पाजवून मारले.
शहरातील तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडवर नाल्यालगत निर्मनुष्य ठिकाणी हा प्रकार घडला. विशाल बट्टू असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. यासंदर्भात विशालची आई कीर्ती बट्टू (वय ३३, रा. भवानी पेठ, सोलापूर) हिने जोडाभावी पेठ पोलीस ठाण्यात पती विजय बट्टू(वय ४३) यांच्या विरोधात तक्रार दिली. विशाल घरातून अचानक बेपत्ता झाला होता. रविवारी रात्री तो तुळजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्यालगत मृतावस्थेत सापडला.
वैद्यकीय तपासणी अहवालात विशालच्या शरीरात सोडिअय नायट्रेट नावाचे विष आढळून आले. पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी तपास करताना विशाल याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व शेजारच्या मंडळींकडे चौकशी केली. यात विशाल याचे वडील विजय बट्टू यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता अखेर त्याने आपला मुलगा विशाल याचा खून आपण स्वतः केल्याची कबुली दिली.