कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे एका व्यक्तीवर अज्ञाताने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. गुलाब बाबालाल शेख (वय-६०, रा. करनूर) असं हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचे नववा आहे. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह शेख यांना बेशुद्धावस्थेत नातेवाईकांनी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कोयता काढला असून, शेख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
गुलाब शेख हे पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांच्यासह करनूर येथे राहतात. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गावात स्मशानभूमीजवळ ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेले होते. काही ग्रामस्थांनी याची माहिती शेख यांच्या कुुटुंबीयांना दिली. शेख यांच्या डोक्यात कोयता मारून तसाचअडकला होता. दोन्ही हातांवर कोयत्याने वार केले होते. अशा गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र तेथील डॉक्टरांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये पोहोचताच डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून डोक्यात अडकलेला कोयता काढला. त्यानंतर शेख यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, शेख यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला? याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.