पाचगणी : सोशल मीडियावर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज कटंकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मालुसरे परिवार रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे राज्य संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांना निवेदन देण्यात आलं आहे.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे हे ‘गड आला पण सिंह गेला’ या सिंहगडावरील लढाईने महाराष्ट्रासह देशाला परिचित आहेत. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची मर्द मराठा म्हणून ओळख असताना सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती दिली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख सरदार तानाजी मालुसरे, यसाजी कंक, रघुजी आंग्रे यांच्या चुकीच्या जातीचा उल्लेख सोशल मीडियात प्रसिद्धी मिळण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे राज्यात जातीय तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवरायांच्या मावळ्यांच्या खोट्या जाती लावून चुकीची माहिती पसरविणाऱ्याने जातीय द्वेष निर्माण करणे, खोटा इतिहास व्हायरल करणे, अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे.
चुकीची माहिती प्रसारित केलेल्या इंस्टाग्राम पेजला मिलियन लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे संपूर्ण मालुसरे परिवारच नव्हे तर सर्व मराठा समाजामध्ये संताप पसरला आहे. तरी या समाजकंटकांविरुद्ध आयपीसी ४९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आम्हाला त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.