अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरा आपल्या सख्ख्या नात्यांवर उठेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती आणि त्यातूनच भयानक कृत्य घडल्याचे आता समोर आले आहे. सख्ख्या मेव्हण्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं आहे.
याबाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे, या प्रकरणी आरोपी राहुल बोधक या नराधमाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरु आहे. बायको नांदायला येत नाही आणि मेव्हण्याने भांडण केले या रागातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 6 सप्टेंबर रोजी श्रीरामपूरातील नायगाव येथून चिमुकल्या स्नेहदीपचं अपहरण करण्यात आलं. मेहुण्याशी झालेल्या भांडणाच्या रागाचा बदला आरोपीनं चिमुकल्याचं अपहरण आणि त्याची हत्या करुन घेतला. या घटनेनं नगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे श्रीरामपूर परिसराला हादराला बसला आहे. स्नेहदीप बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली. त्यानंतर जवळपास 5 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर गारच शिवारात पोलिसांना चिमुकल्या स्नेहदीपचा मृतदेह आढळून आला.
बायको नांदायला येत नाही म्हणून वैजापूर येथील राहुल बोधक हा आठ दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सासुरवाडीला आला होता. तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी ) वाद झाल्यानंतर भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मेव्हण्याचा 3 वर्षीय मुलगा स्नेहदिप त्रिभुवन याचे अपहरण केले होते. यासंदर्भात 6 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
..आणि दिली हत्या केल्याची कबुली
पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला. नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होणार आहे. मात्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.