सांगोला: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण सांगोल्याचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साळुंखे यांनी हाती मशाल घेतली आहे. त्यामुळे आता दीपक साळुखे याना सांगोला विधानसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱ्यानंतर पहिल्यांदाच मी समोर आलो आहे. मधल्या काळत हॉस्पिटलची वारी करावी लागली. आराम करायचा तरी किती? गद्दारांना घालवायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मुहूर्त चांगला लागला आहे. मशाल कशी पेटवायची आणि कोणाकोणाला चटके द्यायचे, हे तुम्हाला ठरवायचे आहे. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोचवा, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान सांगोला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर सुरुवातीपासून ठाम आहेत. त्यामुळे जर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांनी उमेदवारी मिळाली, तर आघाडीत बिघाडी होणार आहे. तसेच बाबासाहेब देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.