पाचगणी : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी सेक्रेटरी नितीन कासुर्डे यांनी दिली.
पांचगणी येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोन येथे पाचगणी रोटरी क्लबने बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे हस्ते झाले. यावेळी प्रोजेक्ट चेअरमन सुनील धनावडे, बालाजी ब्लड बॅंकेचे महेश भोसले आणि सर्व रोटरीयन उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे मानत रोटरी क्लबच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचगणीकरांनी रक्तदान केले. या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट, पाणी जार, कुकर व लॅपटॉप सॅक यापैकी एक भेट म्हणून देण्यात आले.