सातारा : सातारा जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शाॅक लागून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कराड तालुक्यातील गोवारेमध्ये ही घटना घडली. विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तुकाराम सदाशिव खोचरे (वय-५५) व शहाजी सदाशिव खोचरे (वय-५०) अशी शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम व शहाजी खोचरे यांची गावाजवळच शेती आहे. येथे त्यांची विहीर आहे. शेतीला पाणी देण्यासाठी वीजपंप सुरू करण्यासाठी तुकराम हे गेले होते. दरम्यान, फ्युजबॉक्समधून विद्युत पुरवठा सुरू होता. ही बाब तुकाराम यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी फ्यूजबॉक्सला हात लावल्याने त्यांना जोरदार शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब त्यांचा भाऊ शहाजी यांच्या लक्षात आली ते तुकाराम यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा शॉक लागला. यामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला.
दरम्यान, दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचा फोन लागत होता, पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे सायंकाळी शोधत तुकाराम खोचरेंचा मुलगा शेताकडे गेला. त्यानंतर दोघेही फ्युजबॉक्स जवळ मृतावस्थेत पडले होते. मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर रात्री कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.