सातारा : कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे.
कोयना खोऱ्यात २०२३ मध्ये भूकंपाचे ७ धक्के बसले होते. ८ जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंपाचा धक्का कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपानं पडझड झालेली नाही. यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे. सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली ९ किलोमीटर होती.