कोल्हापूर : रब्बी हंगाम १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून, शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरिता आधी ई-पीक पाहणी मोबाइल अॅप उपलब्ध होते; परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी डीसीएस संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १०० टक्के पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाठी यांच्यामार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरिता सहायकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी १ सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे.
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी एमएसपी मोबाईल अॅपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. नवीन मोबाईल अॅपमधील आवश्यकता पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य व पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, आपण आपली पीक पाहणी ठरावीक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता अडचण येणार नाही.