कराड : क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. योग्यवेळी रोगाचे निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. निदानासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. त्यावर अँटिबायोटिक्स वापरून उपचार होतात. योग्यवेळी योग्य निदान आणि वैद्यकीय उपचारांनंतर हा आजार बरा होतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार यांनी सांगितले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तळमावले (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र गुढे, काढणे, कुंभारगाव, खळेत येथे जनजागृती करण्यात आली. जनजागृती अभियानात दोन आठवड्यांपेक्षा खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, मानेवर गाठ याप्रकारे आरोग्य शिक्षण दिले, तसेच प्रभात फेरीही काढण्यात आली. ही जनजागृती तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डॉ. पवार म्हणाले, क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असल्याने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो. क्षयरोग झाला म्हणून घाबरु नका. हा आजार सरकारी दवाखान्यात सहा ते आठ महिन्यांच्या उपचाराने बरा होतो. हा उपचार पूर्ण मोफत उपलब्ध असून, प्रत्येक रुग्णासाठी सहा ते नऊ महिन्यांचे औषधोपचार अखंडित सुरु ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतात क्षयरोगाचे प्रमाण अधिक
यावेळी बोलताना डॉ. नितीन वांगीकर म्हणाले की, भारतात क्षयरोगाचे प्रमाण अधिक असून, दररोज ४० हजारांहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो. दररोज एक हजारपेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगामुळे दगावतात. क्षयरुग्ण हे नवीन थुंकी दूषित असतात व उरलेले थुंकी अदूषित असतात. या नवीन थुंकीदूषित क्षयरुग्णांमधील साधारणतः सहा टक्के क्षयरुग्ण मृत्यू पावतात. तर नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९० टक्के आहे.
यावेळी वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक हनुमंत यादव, पाटील, आरोग्य सहाय्यक शरद कांबळे, जामसिंग पावरा, औषध निर्माण अधिकारी दीपाली चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, धैर्यशील सपकाळ, आरोग्यसेवक रोहीत भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्यसेविका रंजना कुंभार, विद्या लोहार, सोनाली परीट, सुप्रिया पवार व तळमावलेच्या सर्व आशासेविका गटप्रवर्तक वैशाली डुबल, कोमल महादर, निलम काजारी आदी उपस्थित होते.