अहिल्यानगर: शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने, चांदी याबरोबरच रोख स्वरुपातील पैशांचे मोठे दान साईभक्त देत आहेत. त्यातच आता शनिवारी आंध्रप्रदेशमधील एका साईभक्ताने 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट दान दिल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून भाविकांकडून दानाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात सुवर्ण मुकुट येत आहेत. शनिवार (ता.19 एप्रिल) रोजी, आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने साईचरणी 788.44 ग्रॅम वजनाचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. त्यामुळे आता साईबाबा संस्थानकडे सुवर्ण मुकुटांची संख्या 28 वर पोहचली आहे. मुकुटासोबत सोन्याचे दागिने दान देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.