सोलापूर : येथील द्वारकानगरी येथे राहणाऱ्या डॉ. प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी या सिद्धेश्वर मंदिरात १४ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास दर्शनासाठी गेल्या होत्या. परंतु, त्या घरी न परतल्याने पती प्रांजल प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३८, रा. द्वारकानगरी, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी प्रांजल प्रफुल्ल कुलकर्णी हे १४ सप्टेंबर रोजी देवदर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिरात गेले होते. तेथे पत्नी डॉ. प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी (वय ३५) यांची भेट झाली. निघताना पत्नी डॉ. प्रज्ञा यांनी मी देवदर्शन आटोपून घरी येते, तुम्ही पुढे चला असे सांगितले. त्यावेळी ते घरी निघून आले. परंतु, पत्नी घरी आली नाही. त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, त्या अद्यापही परत न आल्याने याबाबतची फिर्याद फौजदारी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.