सांगली: सांगलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय-30, रा. माळ गल्ली, इस्लामपूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 23 एप्रिल ला मध्यरात्री इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील एका धाब्याच्या परिसरात घडली आहे.
याप्रकरणी गणेश रामचंद्र केर्लेकर (वय-38, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तदिलेल्या क्रारीवरून अरविंद ऊर्फ राघू सुभाष साटम (वय-32, रा. शिवनगर, इस्लामपूर) व किरण रामचंद्र सातपुते (वय-35, मूळ रा. रेड, ता. शिराळा, सध्या रा. संभूआप्पा मठाजवळ, इस्लामपूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद ऊर्फ राघू साटम याला त्याच्या पत्नीसोबत सौरभ केर्लेकर याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या रागातून वाघवाडी फाटा येथील अशोक धाब्याच्या समोरील गेटजवळ किरण सातपुते याने सौरभला बोलावून घेतले व तेथे पकडून ठेवले. त्यानंतर अरविंद ऊर्फ राघू साटमने लाकडी बेसबॉलच्या स्टिकने केर्लेकर याच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्यानंतर मारहाण करून दोघे घरी गेले. या मारहाणीत सौरभ केर्लेकरचा जागीच मृत्यू झाला. मृत केर्लेकर हा अविवाहित होता तो डी.जे. ऑपरेटर म्हणून काम करत होता. तत्पूर्वी तो एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणूनही काम करत होता.
दरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच संशयित पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवत दोघांनाही अटक केली. दरम्यान घटनेबाबत दोघांची चौकशी केली. या चौकशीत दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसुन चौकशी केली असता दोघांनीही केलेल्या खुनाची कबुली दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.