लहू चव्हाण
पांचगणी : तालुक्यातील संस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध व्यवसाय उभारण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील आहेत. सोसायट्यांनी पर्यटन स्थळाला साजेसे व्यवसाय करून आपली आर्थिक वृद्धी साधण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले.
पांचगणी विकास सेवा सोसायटी, ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगर शेती पतसंस्था, पांचगणी विकास सेवा सोसायटी, ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगर शेती पतसंस्था आणि जनसेवा दुध उत्पादक संस्थेच्या सर्वसाधारण सभा सयुक्तिक रित्या पांचगणी येथील राधा कृष्ण मंदिर सभागृहात पार पडली. यावेळी राजपुरे बोलत होते.
यावेळी संस्थेचे सोसायटी चेअरमन शंकरराव कळंबे, पतसंस्था चेअरमन महेंद्र पांगारे, जनसेवेचे अध्यक्ष राजेंद्र आंब्राळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे चेअरमन महादेव दुधाने, विभागीय विकास अधिकारी निकम साहेब, दत्तात्रय महाराज कळंबे, जावळी सहकारी बँकेचे संचालक अजित कळंबे, अंकुश मालुसरे, तुकाराम मालुसरे, आर. डी. मालुसरे, अशोक राजपुरे, लक्ष्मण भिलारे, अशोक दुधाने, विठ्ठल दुधाने, शांताराम राजपूरे, गोडवली सरपंच विष्णू मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले, जिल्हा बँक सोसायट्यांचे माध्यमातून स्ट्रॉबेरी पिकासाठी भरघोस कर्जवाटप करीत आहे. व्यावसायिकांना उभे करण्यासाठी पतसंस्था ही आर्थिक लाभ युवकांना देत आहे. याचा लाभ घेताना कर्जाचे हप्ते ही कर्जदारांनी वेळेवर भरावे असे सांगितले.
सहकार भारती प्रशिक्षक वैभव शिंदे यांनी सभासदांना विशेष मार्गदर्शन केले. महादेव दुधाने, अरविंद कळंबे, आर.डी. मालुसरे यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले. कळंबे महाराज पतसंस्थेच्या सभासदांचा वाढता विस्तार पाहता भौसे येथे विस्तारित कक्ष उभारण्याचा निर्णय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संस्थांची ताळेबंद पत्रके व नफातोटा पत्रके यांचे वाचन व्यवस्थापक विलास राजपुरे यांनी केले. तर महेंद्र पांगारे यांनी आभार मानले.
संस्थेच्या जागेत गाळे बांधून संस्थेचे उत्पन्न वाढवणार
संस्थेचे मालकीच्या जागा संदर्भात बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले, आपण आतापर्यंत सामोपचाराने विनंती केली होती, आता न थांबता कायदेशीरपणे काम करावे लागेल. तसेच इतर जागांमध्ये गाळे बांधून त्यातुन संस्थेला अधिक उत्पन्न कसे मिळेल, यासाठी आमचे सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.