सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भांडण सुरु असताना रागाच्या भरात पत्नीने पतीला दंडुक्याने मारहाण केली. या घटनेत पतीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळप्पा नंदकुमार हेले (वय-३५) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. आरोपी पत्नीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. प्रगती धुळप्पा हेले (वय ३२, रा. तांदूळवाडी) असं अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी धुळप्पा याची आई सोनाबाई नंदकुमार हेले (वय-५५, रा. तांदूळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई या नातेवाईकांचे लग्न असल्याने कुंभारीला गेल्या होत्या. घरात सकाळपासूनच मुलगा धुळप्पा व सून प्रगती यांच्यात भांडण सुरू होते. भांडणात धुळप्पा याने प्रगतीला मारहाण केली. या मारहाणीत तीही जखमी झाली होती. भांडण विकोपाला गेल्याने तिने पतीच्या दंडुक्याने डोक्यावर मारल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि बेशुद्ध अवस्थेत पडला. त्यानंतर दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारावेळी धुळप्पा याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, प्रगतीने स्वतः कॉल करून दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा करून प्रगतीला रुग्णालयातून ताब्यात घेतले. धुळप्पा आणि प्रगतीचा १५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना सात वर्षाची इशू आणि १२ वर्षाची प्राची अशा दोन मुली आहेत.